अहमदनगर : परप्रांतात एस.टी. बसेस बंद झाल्याने एक हजारांच्यावर परप्रांतीय नागरिक अहमदनगरमध्ये अडकले आहेत. त्यातील काही नागरिक, मजूरांनी तारकपूर बसस्थानक परिसरात ठाण मांडले. राहण्याची किंवा जाण्याची तरी सोय करा, अशी ते विनवणी करीत आहेत. मात्र बाराशे लोक झाल्याशिवाय रेल्वेची व्यवस्था करणे शक्य नसल्याने या परप्रांतीय नागरिकांचे नगरमध्ये हाल सुरू झाले आहेत. आजपर्यंत एस. टी. महामंडळाच्या बसेसद्वारे तसेच रेल्वेद्वारे परप्रांतीय नागरिकांची त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र आजही अनेक परप्रांतीय नागरिक अडकलेले आहेत. सुपा, बोल्हेगाव, नागापूर, नेवासा, तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहुन तब्बल एक हजार नागरिक नगरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातील अनेक नागरिक गुरुवारी तारकपूर बसस्थानक परिसरात जमा झाले होते. स्नेहालयातर्फे त्यांना तेथे नाश्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी आर्त हाक ते देत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. अशा नागरिकांची नगर शहरात गर्दी वाढली तर नगरला आणखी कोरोनाचा धोका होऊ शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे.दरम्यान सर्व नागरिकांची व्यवस्था महापालिकेने करावी. त्यांना भोजन, चहा, नाश्ता देण्याची आम्ही व्यवस्था करू, असे स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. मात्र महापालिकेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. निवारा केंद्रात गर्दी झाली आहे. तेथे जागा नाही. त्यामुळे त्यांची सध्या राहण्याची व्यवस्था करू शकत नसल्याची हतबलता महापालिकेने व्यक्त केली. अॅड. श्याम असावा यांनी सर्व नागरिकांना प्रशासकीय पूर्तता करून पाठविण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन नागरिकांना भेटून दिले.परप्रांतीय नागरिक दिवसभर तारकपूर बसस्थानकात होतो. सायंकाळी सहानंतर तारकपूर स्थानक बंद होणार आहे. नागरिकांनी बसस्थानकाच्या बाहेर जावे, असे फर्मान एस.टी. चे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या नागरिकांचा सहानंतर कुठे जायचे? हाच खरा प्रश्न आहे.
जाण्याची सोय नाही..राहण्याचीही सोय नाही...प्रशासन ढिम्म, तारकपूर बसस्थानकात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 4:01 PM