शेवगाव : आजच्या युवकांनी सामाजिक ऐक्य, सामाजिक न्याय व सामाजिक समतेच्या माध्यमातून देशाची उन्नती साधायला हवी. परिश्रम वाया जात नाही, फुकटचे काही मिळत नाही, कष्टाशिवाय समाधान नाही याची जाणीव युवकांमध्ये क्रांतीची बिजे पेरू शकतात. त्या ध्येयाने तरूणांनी वाटचाल करावी, असा सल्ला सातारा येथील पोलीस अधीक्षक व मूळच्या पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील तेजस्वी सातपुते यांनी दिला.युवा दिनानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी युवकांना काही कानगोष्टी सांगितल्या. समाजामध्ये जे उच्च शिखरावर पोहोचले त्यांचा पाया कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व सकारात्मकतेचे संस्कार यावर आधारित होता. आजच्या युवकांना फास्ट फूड व फास्ट नॉलेज याची इतकी सवय लागली आहे की यातील योग्य व अयोग्य काय याचे स्पष्टीकरण करता येत नाही. शरीर, बुद्धी व मन यांचा समतोल विकास साधताना स्वामी विवेकानंदांप्रमाणे जगण्याची तयारी हवी. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे बहुसंख्य तरुणांची स्थिती मनोरुग्णासारखी झाली आहे. कुटुंब, समाज व भावनिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून परकियांचे आक्रमण थोपवणारी देशव्यापी यंत्रणा तरूणांकडून उभी रहायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकीकडे समाजात महिला असुरक्षित आहेत, तर दुस-या बाजूने आम्ही स्री-पुरुष समानतेचे गोडवे गातो, ही असमानता दूर व्हायला हवी. आजच्या युवकांकडे उद्याच्या शक्तिमान भारताचे आधारस्तंभ म्हणून पाहिले जाते. जागतिक महासत्ता होण्याची देशाची सिद्धता पाहता युवकांनी यासाठी मनाने सिद्ध व्हायला हवे. प्रशासनाच्या माध्यमातून देशाची गाडी अचूकपणे ओढणारी पिढी प्रभावीपणे पुढे यायला हवी. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांशी संवाद साधताना ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी न्यूनगंड व अपराधीपणाची भावना दूर सारावी. माझी पार्श्वभूमी ग्रामीण असूनही ध्येय निश्चित करून परिश्रम व आत्मविश्वासाच्या बळावर मी पोलीस खात्यातील वरिष्ठपद मिळवू शकले, असे त्या अभिमानाने म्हणाल्या.
फुकट काही मिळत नाही, परिश्रम वाया जात नाही-तेजस्वी सातपुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 6:45 PM