अहमदनगर : केंद्र सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालून पुढे जावे लागेल. सध्या नगरमध्येही कोरोना चाचण्या वाढवलेल्या आहेत. यावर कोणी लोकप्रतिनिधी लॉकडाऊनची मागणी करत असेल तर त्यांना केंद्र सरकारचा निर्णय मान्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो, असे सांगत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज नसल्याचे संकेत देऊन लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार सुजय विखे यांना टोला लगावला आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्राची पाऊले लॉकडाऊन उठवण्याकडे आहेत. पूर्वी दुचाकीवर एका व्यक्तीला परवानगी होती आता ती केंद्राने दोन व्यक्तींना केली आहे. या कोरोनाच्या काळात आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालावा लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर प्रत्येकाला काळजी घ्यायचीच आहे. परंतु दुसरीकडे उपाशी राहून कोणाचा जीव जायला नको. त्यामुळे यावर मध्य मार्ग काढून पुढे जावे लागेल. लॉकडाऊन उठवण्याच्या दिशेने केंद्र निर्णय घेत आहे. मग केंद्राचे निर्णय आपल्याला मान्य नाहीत का? असा टोला त्यांनी खासदार विखे यांना लगावला.विखे हे भाजपचे खासदार असून ते प्रशासनावर आरोप करत नगरमध्ये पूर्ण लॉकडाऊनची मागणी वारंवार करत आहेत. त्यावर आमदार पवार यांनी लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगत प्रशासनाची बाजू घेतली आहे.सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी भाजप राजकारण करत असून त्यांनी केवळ हवेतील आरोप करू नयेत. ठोस पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावे. गेल्या पाच वर्षांत ज्या पोलिसांचे संरक्षण घेतले आता त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊ नये, असेही पवार म्हणाले.
नगर जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज नाही; रोहित पवारांचा सुजय विखेंना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 3:16 PM