अहमदनगर : नगरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरी स्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे सध्या तरी नगर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही, अशी माहिती पालकमंत्रीहसन मुश्रीफ यांनी दिली.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी (२४ जुलै) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतला. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांनी कोरोनाच्या स्थितीबद्दल सविस्तर चर्चा केली.
सध्या नगरमध्ये रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. रूग्णांना लागणाºया बेडची व्यवस्था तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात आहे. नगर शहरातही बेड वाढवले आहेत. त्यामुळे स्थिती आटोक्यात असून सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन होणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
सध्या श्रावण महिना सुरू आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, बकरी ईद, गोकुळाष्टमी, स्वातंत्र्यदिन असे अनेक सण-उत्सव पुढील पंधरा दिवसांत आहेत. त्यामुळे लोकांनी घरात राहूनच हे सण साजरे करावेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले तर आपण नक्कीच कोरोनावर मात करू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.