दुष्काळसाठी पंचांग पाहण्याची गरज नाही : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:07 PM2018-10-10T12:07:06+5:302018-10-10T12:07:19+5:30

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये.

There is no need to see the almanac for drought: Ashok Chavan | दुष्काळसाठी पंचांग पाहण्याची गरज नाही : अशोक चव्हाण

दुष्काळसाठी पंचांग पाहण्याची गरज नाही : अशोक चव्हाण

अहमदनगर : दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. शेतकरी होरपळत असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे ‘लोकमत’शी संवाद साधताना केली.
जनसंघर्ष यात्रेनिमित्त चव्हाण जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली़ ते म्हणाले, मुख्यमंत्री ३१ आॅक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करु असे सांगत आहेत. अजून यांचे पाहणी दौरेच व्हायचे आहेत. पडलेला पाऊस, धरणातील पाणीसाठे आणि उपलब्ध चारा याचे अहवाल असताना सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे? कापसावर बोंडअळी व उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे. शेतक-यांना विजेचे रोहित्र मिळत नाहीत़ भारनियमन सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.
जनता आता या सरकारचाच ‘लोड’ कमी करण्याच्या विचारात आहे.यंत्रणेचा दुरुपयोग करुन सरकार व्यापा-यांवर छापे टाकत आहे. गुजरात निवडणुकीच्या पूर्वीही व्यापा-यांना अशीच भीती दाखविण्यात आली. शेअर बाजार कोसळला आहे. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे सर्वच जनता त्रस्त असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व सरचिटणीस विनायक देशमुख यावेळी त्यांच्यासमवेत होते.
नगर मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा करू
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी डॉ़ सुजय विखे इच्छुक आहेत ही वस्तुस्थिती आहे़ मात्र हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याबाबत राष्ट्रवादीसोबत अद्याप औपचारिक चर्चा झालेली नाही़ काँग्रेसपक्षांतर्गत याबाबत निर्णय होऊन नंतर राष्ट्रवादीसोबत चर्चा केली जाईल़ राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास तयार नाही, याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने तयारी करत असतो़ त्यांची ४८ मतदारसंघ लढण्याची तयारी असल्यास आमचीही ती असतेच.

निवडणुका आल्या की सेनेला राम आठवतो
राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने काढला याचा अर्थच असा की निवडणुका आल्या आहेत. निवडणूक आली की सेनेला हा मुद्दा आठवतो. भाजप-सेना एकच आहेत. ते भांडणाचा फार्स करतात. सनातन संस्था दहशती कृत्य करत आहे हे उघड झाले आहे. नव्याने समोर आलेल्या स्टिंगमधूनही ते दिसते. परंतु भाजप सरकार या संघटनेबाबत नरम धोरण घेत आहे. संजय राऊत ‘सनातन’च्या कार्यक्रमाला जाणार आहेत कारण सेनाही त्यांना पाठिशी घालते, असे चव्हाण म्हणाले.

राष्टÑवादीसोबत १२ रोजी मतदारसंघनिहाय चर्चा
राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे लोकसभेचे काही मतदारसंघ मागितले आहेत याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, प्रत्येक मतदारसंघ निहाय कॉंग्रेसची येत्या ११ तारखेला बैठक आहे. त्यानंतर राष्टÑवादीसोबत १२ आॅक्टोबरला बैठक होईल. प्रकाश आंबेडकरांसोबतही बोलणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेडकरांनी अद्याप जागांचा प्रस्ताव दिलेला नाही़ पहिल्या टप्यात त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे व माणिकराव ठाकरे यांनी चर्चा केलेली आहे़ ते एमआयएमसोबत गेले असले तरी त्यांनी आम्हाला नकार दिलेला नाही.

Web Title: There is no need to see the almanac for drought: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.