संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि. ०८) दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत हा आदेश देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना तहसीलदार निकम म्हणाले, वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी खूप विचार तो घेतला आहे.
लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येते आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीचे लसीकरण न करता त्याची लक्षणे बघून सौम्य लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये आणि मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. रविवारी (दि. ९) दुपारपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आलेल्या १२८ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी कुणीहीही टेस्ट पॉझिटिव्ह न आल्याने त्या सर्वांचे लसीकरण करण्यात आल्याचेही तहसीलदार निकम यांनी सांगितले.