याबाबत पाठविलेल्या निवेदनात लहामगे यांनी म्हटले आहे की, नुकतेच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा नवजात शिशूंचा आगीने होरपळून मृत्यू झाला. प्रशासनाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिटचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र हा आगीचा प्रकार फक्त हॉस्पिटल पुरता मर्यादित नसून, सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडिट होणे गरजेचे आहे.फायर ऑडिट करणे बंधनकारक असताना देखील रुग्णालये, सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालयांचे नियमित फायर ऑडिट होत नाही. प्रशासनाच्या अशा बेफिकिरीमुळे भंडारा जिल्ह्यासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. फायर सेफ्टीबाबत सर्वच अनभिज्ञ असून, या घटनेचा धडा घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने उपाययोजना व्हावी.
अहमदनगर शहरात महापालिकेचा अग्निशमक विभाग असून, यामध्ये जुनाट व जीर्ण झालेली दोनच वाहने आहेत. महापालिकेचे जुने सभागृह आगीत भस्मसात झाले. त्याचवेळी अग्निशमक विभाग अद्ययावत करण्याची गरज होती. शहरात मोठी आग लागल्यास इतर ठिकाणाहून अग्निशमकबंब बोलविण्यात येतात. यामध्ये मोठा वेळ वाया जातो. त्यामुळे हा विभाग अद्ययावत व सुसज्ज करावा, अशी मागणी लहामगे यांनी केली आहे.