मुंबई - राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आपण प्रत्यक्ष संपात सहभागी होऊ शकत नसलो तरी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अण्णांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी, अण्णांनी संपातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, सरकारवर दबाव वाढविण्याचंही अण्णांनी सूचवलं आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज 15 वा दिवस आहे. परिवाहन मंत्री अनिल परब (Anil Parab ) यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत संपाबाबत चर्चा केली. या संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होत आहे. एकीकडे भाजप नेते संपात सहभागी होत आहेत. तर, दुसरीकडे आता अण्णा हजारे यांनीही संपातून सरकारवर दबाव टाकण्याचं सूचवलं आहे.
अण्णा हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नाहीत. मात्र, कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी शिष्टमंडळाला काही सूचना केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शविली आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. पण, आत्तापर्यंत ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही, असे अण्णांनी म्हटले आहे.
दरम्यान, लाखो नागरिकांनी एकाचवेळी बाहेर पडले पाहिजे. दबाव आल्याशिवाय आणि सरकार पडू शकते, असे वाटल्याशिवाय कोणतेही सरकार हालत नाही. मात्र, कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने केले पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची यामध्ये हानी होता कामा नये, असे आवाहनही अण्णांनी केले आहे.