अहमदनगर : अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे मुळा जलाशयातील दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे़ पिण्याच्या पाण्यापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाण्यापेक्षा दुप्पट पाणी बाष्पीभवनाव्दारे हवेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार पाटबंधारे विभागाच्या अहवालावरून समोर आला आहे़ दररोज २५ कोटी लीटर पाण्याची वाफ होत आहे़जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्याची भिस्त मुळा धरणावर आहे़ उपलब्ध पाणीसाठ्याचे जुलै अखेरपर्यंतचे नियोजनही करण्यात आले आहे़ पाणी पातळी खालावल्याने जिल्हा प्रशासनही पाण्यावर लक्ष ठेवून आहे़ मुळा धरणात एकूण ६ टीएमसी पाणीसाठा आहे़ हे सर्व पाणी पिण्यासाठी राखीव आहे़ धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे़ दिवसभरात १४ दशलक्ष घनफुटाने पाणी पातळी खोल जात आहे़ त्यापैकी साडेनऊ ते दहा दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे़म्हणजे दररोज पिण्यासाठी अवघे ४ दशलक्ष घनफूट इतकेच पाणी लागते़ पण, त्यापेक्षा अधिक पाणी बाष्पीभवनाव्दारे हवेत जाते़ अचानक वाढलेली उष्णता हे त्यामागील कारण आहे़ मागील वर्षी मे महिन्यात बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याचे प्रमाण सात दशलक्ष घनफूट इतके होते़ धरणात पुरेसे पाणी असते, त्यावेळी लांबपर्यंत पसरलेले असते़ यंदा मात्र तशी स्थिती नाही़ पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे आकारमान कमालीचे कमी झाले आहे़ असे असूनही बाष्पीभवन होण्याचे प्रमाण अधिक असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ मुळा धरणावर नगर शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या आठ पाणी योजना आहेत़ पाणीपातळी खोल गेल्याने शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट झाली होती़ त्यामुळे महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी नवीन अत्याधुनिक विद्युत पंप बसविले़ पंप बसविल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ झाली आहे़ पण, इतर पाणी योजनांची स्थितीही चिंताजनक आहे़ (प्रतिनिधी)
दररोज ९ दशलक्ष घनफूट पाण्याची होते वाफ
By admin | Published: May 18, 2016 11:52 PM