लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : निवडणुकीत उमेदवार ठरावीक चिन्हांचीच मागणी करतात. यामुळे निवडणूक आयोगाने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत असणाऱ्या ४० चिन्हांत वाढ करून ती १९० केले आहेत. यात बदलत्या जमान्याला शोभतील असे डिजीटल चिन्ह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, दैनंदिन वापराच्या वस्तू, स्वयंपाक घरातील वस्तू,भाजी, फळे अशा विविध चिन्हांचा समावेश यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात आला आहे.
सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकींची धामधुम सुरू आहे. निवडणुकीत आपले चिन्ह काय असावे याचा विचार इच्छुक उमेदवारांनी आधीपासूनच सुरू केला आहे. मात्र चिन्ह वाटप करताना काही ठरावीक चिन्हांनाच उमेदवारांकडून मागणी होते. अशा वेळी निवडणूक अधिकाऱ्यांशी वादावादी घातली जाते. मग निवडणूक अधिकारी प्राधान्यक्रम ठरवून चिन्हांचे वाटप करतात. यामुळे उमेदवारांना नाविलाजाने चिन्ह घ्यावे लागते. ग्रामपंचायत निवडणुकीतील ही अडचण आता निवडणूक आयोगाने दूर केली आहे. पूवीर् असणाऱ्या ४० निवडणूक चिन्हांत यावेळी निवडणूक आयोगाने वाढ करून ती १९० केले आहेत. जवळपास १५० चिन्हांची यंदा वाढ करण्यात आली आहे. उमेदवारांना आपल्या मनपसंद चिन्हांची निवड करता यावी यासाठी त्यांची यादी निवडणूक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावली आहे. सध्याच्या डिजीटल व हायटेक जमान्याला शोभतील अशा चिन्हांचा समावेश यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात आला आहे.
या चिन्हात ए .सी., सीसीटिव्ही कॅमेरा, माऊस, संगणक, लॅपटॉप, हेडफोन, लाइटर, डिश अँटेंना, गणकयंत्र, फोन चार्जर, टी. व्ही. रिमोट, पेन ड्राईव, इंजेक्शन, स्वीच बोर्ड अशा डिजीटल साधनांबरोबरच हेल्मेट, नेलकटर, मिक्सर, माइक, दुर्बिण, कढई, ब्रेड टोस्टर, उशी, फ्रीज, स्टॅपलर, सेफ्टी पीन अशा घरगुती व स्वयंपाक घरातील वापराच्या वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे.
याबरोबरच ढोबळी मिरची, फुलकोबी, आले, हिरवी मिरची, भेंडी, मका, वाटाणे या भाज्यांसोबत अननस, कलिंगड, द्राक्षे, पेरू, नारळ अशा फळांचा चिन्हात समावेश करण्यात आला आहे .
....