अस्तगाव (जि. अहमदनगर) - राहाता तालुक्यातील आडगाव शिवारात सोमवारी जवळपास ४० श्वान मृतावस्थेत आढळले. तीन ठिकाणी दहा ते बारा अशा संख्येत हे मृत श्वान होते. त्यामुळे या परिसरात एक खळबळ उडाली आहे.आडगाव येथील खंडोबाच्या देवस्थानापासून आडगावहून गोगलगावला जाणाºया रस्त्याच्यालगत तीन ठिकाणी काही अंतरावर दहा ते बाराच्या संख्येत हे मृत श्वान आढळले. हा प्रकार सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी आज्ञातांनी कुत्रे मारून टाकले असावेत, असा अंदाज आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर कुत्रे फिरू देऊ नका, अशी तंबी गेल्या दोन दिवसांपासून पोलिसही देत असल्याची चर्चा गावात सुरू होती. त्याबाबत ग्रामपंचायतीलाही काही सूचना केल्याचे समजते. मात्र याबाबत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अथवा सदस्यांनी बोलण्यास नकार दिला. ----पाहणी केल्यानंतर जवळपास तीन ठिकाणी कुत्रे मेलेल्या अवस्थेत आहेत. हे कुत्रे त्या गावातील नाहीत. त्यांना मारून येथे कोणी तरी टाकले असल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायतीने कुत्र्यांची विल्हेवाट लावली पाहिजे. नाही तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल.-दशरथ दिघे, पशुवैद्यकीय अधिकारी---पंतप्रधान दौºयाकडे ग्रामस्थांचे बोट...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ आॅक्टोबरला शिर्डी येथे दौरा आहे. त्यामुळे प्रशासनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे शिर्डी येथील नगरपंचायत प्रशासनाने परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडून अस्तगाव परिसरात सोडले असावे, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. कुत्र्यांना थेट मारूनच या परिसरात टाकल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राहाता तालुक्यात चाळीस मृत श्वान आढळले, पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे ग्रामस्थांचे बोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 11:01 PM