अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची रस्त्यावरच कोविड चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेतील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. तशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
शहरातील कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत वाकळे यांनी महापालिकेतील सर्वच पक्षांच्या गटनेत्यांची बैठक सोमवारी घेतली. या बैठकीस स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर, उपमहापौर तथा भाजपच्या गटनेत्या मालन ढोणे, सेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे, काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव, माजी नगरसेवक सचिन जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे आदी भाजपचे मंडल अध्यक्ष अजय चितळे आदी उपस्थित होते. वाकळे म्हणाले, शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार घ्यावे, अशा रुग्णांनी बाहेर फिरू नये. रुग्ण वेळेवर उपचार घेत नसल्याने, त्यांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सभापती घुले म्हणाले, महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी याेग्य नियोजन करणे आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने नव्याने प्लॅट सुरू करावा, जेणेकरून वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होईल.
...
दररोज ६०० टाक्या ऑक्सिजन उपलब्ध होणार
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे, परंतु ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. नागापूर औद्योगिक वसाहतीत बंद पडलेला ऑक्सिजनचा प्लँट सुरू करण्यात आला आहे. मंगळवारपासून ६०० टाक्या ऑक्सिजन तयार होऊन तो नगर शहरातील रुग्णालयांना पुरविला जणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यावेळी दिली.