लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: लोकसभा निवडणुकीत जे आश्वासन दिले, ते चार वर्षातच पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. पुढील दोन वर्षांत सर्व प्रस्तावित कामे पूर्ण करण्यात येतील. शेवटच्या वर्षात एकही भूमिपूजन करणार नाही, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
खासदार विखे म्हणाले, नगर-शिर्डी रस्त्यासाठी गेली दहा वर्षे राज्य सरकारकडे भीक मागत होतो; परंतु राज्य सरकारने निधी दिला नाही. भाजप सरकारमध्ये खासदार झालो. शहरातील प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याने भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघाला. या कामात आता कोणताही अडथळा नाही. नगर- शिर्डी महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले होते. या कामासाठी केंद्र सरकारने ५०० कोटी मंजूर केले आहेत. या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे काम पुढील महिन्यात सुरू होईल. नगर करमाळा रस्त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर आहेत. बाह्यवळण रस्त्यासाठी ७५० कोटी मंजूर झाले असून, या कामाला पुढील महिन्यांत सुरुवात होईल.
सुरत- चेन्नई ग्रीन फील्ड हा राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यातून सोलापूर मार्गे चेन्नईला जाणार आहे. केंद्र शासनाच्या अत्मनिर्भर योजनेंतर्गत जिल्ह्याला ४५ कोटी मंजूर झाले आहेत. यामध्ये शेवगाव पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात मोठे प्रकल्प उभे राहणार आहेत. देशातील एक हजार बाजार समित्या ई-बाजारशी जोडल्या जाणार आहेत. बाजार समित्यांची परवानगी लागणार असून, जिल्ह्यातील बाजार समितीचे संमतीपत्र सरकारला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
...
उड्डाणपुलाच्या नावाबाबतचा निर्णय महापालिकेचा
उड्डाणपुलाच्या नावाबाबतचा मुद्दा उपस्थित होत असल्याकडे पत्रकारांनी विखे यांचे लक्ष वेधले असता भाजपाचे शहराध्यक्ष भय्या गंधे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, खासदार विखे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याने भूसंपादन मार्गी लागले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू असून, नाव देण्याचा विषय महापालिकेच्या अखत्यारित येतो.
..
व्हीआरडीबाबत आता राजनाथ सिंहच बोलतील
येथील व्हीआरडी स्थलांतरीत होणार नाही, हे वेळोवेळी सांगितलेले आहे. याबाबत संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही झालेली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची वेळ मागितली आहे. येत्या ९ एप्रिल रोजी ते नगर दौऱ्यावर येतील, त्यावेळी तेच व्हीआरडीबाबत सांगतील, असे विखे यांनी सांगितले.
....