श्रीगोंदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी चालू आहे. श्रीगोंदा तालुक्यात प्रवेश करण्यापूर्वीच चेक पोस्ट नाक्यावर थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने दहा तज्ञांची नेमणूक केली आहे.श्रीगोंदा तालुक्यात निमगाव खलु, गव्हाणेवाडी, काष्टी- तांदळी, अजनुज या पाच चेक पोस्ट आहेत. वांगदरीत घोड नदी पुलावर बुधवार (दि. २२) पासून नवी चेक पोस्ट तयार करण्यात येणार आहे. बाहेरुन श्रीगोंद्यात येणाऱ्या वाहनांची या ठिकाणी पोलीस तपासणी करत आहेत. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरुन श्रीगोंद्यात येणा-या प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी करण्यात येणार आहे.मुंबई, पुणे, चिंचवड, पनवेल परिसरातून काही नागरिक श्रीगोंद्यात येत आहेत. अशा नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत का, याची पूर्व तपासणी करण्यासाठी थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासण्यात येणार आहे. जर तशी लक्षणे एखाद्या नागरिकांमध्ये आढळली तर चेक पोस्टवरील तपासणी अधिकारी हे तात्काळ तालुका वैद्यकीय डॉ. नितीन खामकर यांना कळविणार आहेत. त्यानंतर कोरोना संदर्भात पुढील वैद्यकीय तपासणी होणार आहे.नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३१ रुग्ण सापडले आहेत. श्रीगोंदा तालुक्याचा पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, पनवेल शहरांशी सर्वाधिक संपर्क असतानाही केवळ प्रशासनाने घेतलेल्या जबरदारीमुळे एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आलेला नाही.
श्रीगोंद्यात चेक पोस्टवरच होणार थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 1:00 PM