अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातून अनेकांची अधिकारीपदी वर्णी लागली. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील प्रतीक्षा भुते व सोनई येथील दादासाहेब दराडे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली, तर श्रीगोंद्याची कन्या प्रतीक्षाखेतमाळीस हिने पोलीस उपअधीक्षकपदी बाजी मारली. याशिवाय शिर्डीतून विनायक कोते, जामखेडमधून अक्षय रासने, पारनेरमधून तुषार शिंदे यांची तहसीलदारपदी निवड झाली. शिर्डीचेच सुरज कुमावत यांना नायब तहसीलदारपदी संधी मिळाली.
नेवासा तालुक्यातील वंजारवाडी (सोनई) येथील दादासाहेब सुखदेव दराडे यांची उपजिल्हाधिकारी पदावर राज्यात चौथ्या क्रमांकाने निवड झाली. यापूर्वी ते राज्य उत्पादन शुल्क विभागात उपअधीक्षक पदावर मुंबई येथे कार्यरत होते. अभियंता पदवीधर असलेल्या दराडे यांनी शेतकरी कुटुंबातून अतिशय मेहनतीने हे यश संपादन केले. त्यांचे आतेभाऊ उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ व उपअधीक्षक (भूमी अभिलेख) अविनाश मिसाळ यांचे दराडे यांना मार्गदर्शन लाभले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील प्रतीक्षा पोपटराव भुते यांनी मुलींमध्ये आर्थिक व सामाजिक मागास वर्गातून राज्यात दुसºया क्रमांकाने यश मिळवत उपजिल्हाधिकारीपद गाठले. सध्या त्या सांगली विभागात सहाय्यक विक्रीकर आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. खर्डा येथीलच अक्षय संतोष रासने यांचीही तहसीलदारपदी निवड झाली. खर्डा शहरातून दोन युवकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. शिर्डी येथील विनायक कोते यांची तहसीलदार, तर सुरज कुमावत यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली.
विनायक कोते यांनी २०११ मध्ये बायो टेक्नोलॉजीमध्ये पदवी घेतली़ २०१७ मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन नगरपालिका मुख्याधिकारी पद पटकावले़ सध्या ते धुळे महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत़ सुरज कुमावत (परदेशी) यांनी २०१४ मध्ये आयटी इंजिनिअरिंग केले़ या परीक्षेत दुसºया प्रयत्नात त्यांनी नायब तहसीलदार पदी बाजी मारली.
पारनेर तालुक्यातील अळकुटी रस्त्यावरील बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची तहसीलदारपदी वर्णी लागली. ते सध्या चंद्रपूर नगरपरिषदेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील स्नेहा सुरेश क्षीरसागर हिची तहसीलदारपदी निवड झाली. -----आता आयपीएसचे ध्येय...श्रीगोंदा येथील शेतकरी नामदेव खेतमाळीस यांची कन्या प्रतीक्षा हिने या परीक्षेत बाजी मारून पोलीस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. प्रतीक्षाचे वडील शेतकरी, तर आई मिराबाई अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत. प्रतीक्षाने पुण्यातून बीएससी अॅग्रीची पदवी संपादन केली. २०१६ पासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा तिने उत्तीर्ण केली होती. परंतु याहीपेक्षा वरच्या पदावर जाण्याचा तिचा ठाम निश्चय होता आणि अखेर कठोर मेहनतीने तिने यशाला गवसणी घातली. आता आपले ध्येय आयपीएस होण्याचे असल्याचे तिने सांगितले.---मढेवडगावच्या शिंदे बंधुंची धडाकेबाज कामगिरी; एक उपजिल्हाधिकारी, तर दुसरा नायब तहसीलदारश्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील शिंदे बंधुंनी स्पर्धा परीक्षेत जलवा दाखवला. मोठा भाऊ अजय दत्तात्रय शिंदे याने उपजिल्हाधिकारीपदी, तर लहान भाऊ नरेंद्र शिंदे याने नायब तहसीलदारपदाला गवसणी घातली. त्यांचे वडील दत्तात्रय शिंदे हे अभियंता असून आई सुजाता या गृहिणी आहेत. आई-वडिलांनी सुरुवातीपासून मुलांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. अजय हा गेल्या वर्षी सहायक विक्रीकर परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. अजयची उपजिल्हाधिकारी, तर नरेंद्रची नायब तहसीलदारपदी वर्णी लागल्याने दोघांचेही कौतुक होत आहे.