पाथर्डी : भाजपच्या मंत्र्याने चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे स्वागत करण्याऐवजी या निर्णयाविरोधात विखे यांची ‘प्रवरे’ची यंत्रणा न्यायालयात गेली. गत पाच वर्षांत राधाकृष्ण विखे यांना आपण दारुसाठी भांडताना पाहिले. या निवडणुकीतही लोणी व बीडचे नाते दारु कारखान्यांमुळेच जमले आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी पाथर्डीत केली.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. उमेदवार जगताप, माजी आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, जि.प. सदस्या हर्षदा काकडे, प्रभावती ढाकणे, शिवाजीराव काकडे, डॉ. उषा तनपुरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.भाजपचे उमेदवार डॉ. सुजय यांचा ‘कुजय’ असा उल्लेख करीत मुंडे म्हणाले, सुजय यांनी माझ्यावर आरोप केले. पण त्यांनी बोलतांना मर्यादा पाळून संग्राम यांच्याकडून नम्रतेचे धडे घेतले पाहिजेत. निवडणुकीच्या काळात लोणी व बीडच्या बहीण भावाचे नाते कदाचित दारू धंद्यामुळे तयार झाले आहे. एक देशी बनवतात तर दुसरे इंग्रजी. मुंडे साहेबांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला असला तरी मी देखील २२ वर्षे त्यांच्यासोबत सावलीसारखा होतो. त्यामुळे मला सर्व माहिती आहे. मुंडे साहेब पाथर्डीवर जेवढे प्रेम करीत होते तेवढेच प्रेम मीही पाथर्डीवर करीत आहे.साडेचार वर्षांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते विखे यांनी सरकारविरूद्ध केलेला एखादा आरोप दाखवा. यामुळे ‘दाल में कुछ काला है’ अशी शंका येत होती. याउलट मी सरकारमधील १६ मंत्र्यांचा ९० हजार कोटींचा घोटाळा काढला.फक्त भावनिकतेने मते मिळवायची एवढेच काम आमच्या बहिणीने केले. बहिणीसाठी मी माझी उमेदवारी मागे घेतली होती हे त्या विसरल्या. मी मुंडे साहेबांच्या जवळ राहू नये अशी कोणाची इच्छा होती? पंकजा यांनी पाथर्डीसाठी काय केले? असा सवाल त्यांनी केला. यावेळी प्रताप ढाकणे व सत्यजित तांबे यांनी राजीव राजळे यांचा पराभव गतवेळी कुणी केला? हे शोधा असे आवाहन केले. हर्षदा काकडे यांचेही भाषण झाले. शिवशंकर राजळे यांनी आभार मानले.
ते फक्त दारूसाठी भांडले : धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:19 AM