लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरातील काळाराम मंदिराशेजारी असलेल्या रूग्णालयात डॉ. प्रफुल्ल ब्रह्मे यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना खिडकीला लटकवले व त्यांच्या घरातील ४० लाख रुपये घेऊन तिघा चोरट्यांनी लूट केली. सोमवारी पहाटे हा प्रकार घडला. पोलिसांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करत तपास सुरू केला आहे. मंगळवारी परिसरातील प्रमुख मार्गावरील सीसीटिव्हीची तपासणी सुरू करण्यात आली.
कालव्याच्या बाजूला डॉ. ब्रह्मे यांचे रुग्णालय व तेथेच घर आहे. सोमवारी पहाटेच्या वेळी तोंडाला कापड बांधलेल्या तिघा चोरट्यांनी शिडीच्या मदतीने घरावर जाळी तोडून आत प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी दरवाजाला बाहेरून कडी लावली. यावेळी डॉक्टरांच्या पत्नी व मुलगा बाहेरगावी गेलेले होते. दुसरा मुलगा व डॉक्टर ब्रह्मे दोघे घरी होते. घरात आल्यानंतर चोरट्यांनी चिन्मय याच्या खोलीला बाहेरून कडी लावली.
चोरट्यांनी डॉक्टरांचे तोंड दाबत आवाज केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधले. खिडकीला दोरी बांधत त्यांना लटकवले. यानंतर चोरांचा मोर्चा घरातील कपाटाकडे वळाला. कटावणीच्या मदतीने कपाट तोडून त्यातील ४० लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लुटली. वयाने ज्येष्ठ असलेल्या डॉक्टरांनी आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे चोरट्यांना सांगितले. यावेळी चोरांनी त्यांची दोरीने सुटका केली. त्यांना खुर्चीला बांधले. कपाटातील सर्व रोकड चोरट्यांनी बॅगमध्ये भरली. सुमारे २० मिनिटे चोरीचा प्रकार सुरू होता. ते पसार झाल्यानंतर डॉक्टर ब्रह्मे यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर या प्रकाराची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व उपनिरीक्षक समाधान सोळके यांनी तपास हाती घेतला. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र कोणताही माग काढण्यात श्वानाला यश आले नाही. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली.