प्रासंगिक \ सुधीर लंके
गत सोमवारी दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने सोळाशे लिटरच्या डिझेलचा साठा पकडला. नगर शहरात टेलिफोन कार्यालय चौकातील छावणी कॉम्प्लेक्सजवळ एक टँकर नोझलने मालमोटारीत डिझेल भरत होता. एखादा पेट्रोल पंप भासावा असे ते दृश्य दिसते. पेट्रोलियम अॅक्टनुसार पेट्रोल पंपाच्या आवारातच वाहनात इंधन भरावे असा नियम आहे. त्यामुळे गल्लीत जाऊन पाणी वाटावे, तसा डिझेल वाटण्याचा परवाना या टँकरला कुणी दिला? इंधनाची वाहतूक करण्यासाठी त्या टँकरला तसा परवाना घ्यावा लागतो. असा परवाना या टँकरने घेतलेला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.राठोड यांच्या पथकाने कारवाई केल्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. प्रारंभी या पथकाने तडजोडीचा प्रयत्न केला, कागदपत्र अपुरी ठेवून आरोपीला मदत होईल असे कामकाज केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एक उपनिरीक्षक व सात पोलीस निलंबित केले आहेत. याशिवाय राठोड यांचीही गृह विभागाने बुधवारीच बदली केली आहे. पोलिसांनी कुचराई केली असेल तर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, पोलीस उपअधिक्षक मदने यांनी पोलिसांची चौकशी इतकी घाईघाईने पूर्ण कशी केली? जिल्हा पुरवठा अधिकारी यांनीही पंचनाम्यासाठी हजर राहणेबाबत नकार कळविला. डिझेल तपासणीचे किट आमच्याकडे उपलब्ध नसल्याने तुम्ही तुमच्यास्तरावर कारवाई करा, असे त्यांनी कळविले. जिल्हा पुरवठा अधिका?्यांना कोणत्याही पेट्रोल पंपावरुन इंधनाचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्याचा अधिकार आहे. त्यांच्याकडे निरीक्षक आहेत. यंत्रणा नसेल तर हे कार्यालय पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाºयांची यंत्रणाही उपलब्ध करु शकत होते. मात्र, आम्ही येऊ शकत नाही असे त्यांनी कळविले. त्यांची ही भूमिका संशयास्पद व जबाबदारी टाळणारी वाटते. मात्र याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांपैकी कोणीच केलेली दिसत नाही. राठोड यांची बदली होताच गुरुवारी राठोड व पोलीस कॉन्स्टेबल गर्जे यांच्या संभाषणाची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. हे संभाषण खरे असेल तर ती गंभीर बाब आहे. त्याबद्दल या दोघांवरही कारवाई व्हायला हवी. मात्र, राठोड यांची बदली या संभाषणामुळे झाली की डिझेल प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे? असाही प्रश्न आहे. आपण डिझेल प्रकरणात केलेल्या कारवाईमुळेच आपली बदली झाली अशी प्रतिक्रिया राठोड यांनी एका वाहिनीला दिली. तसे असेल तर तेही गंभीर आहे. कुणाला वाचविण्यासाठी पोलिसांचा बळी घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास आता उपअधीक्षकांकडे सोपविला आहे. कर्मचाºयांनी छाप्यात काही गडबडी केल्या असतील तर ते कारवाईस पात्र आहेत. पण, त्यांनी जो काही गुन्हा दाखल केला आहे त्याच्या तपासाबाबत काय कार्यवाही झाली आहे. डिझेल आले कोठून? ते बनावट असेल तर कोेठे बनले? त्याचे सूत्रधार कोण आहेत? हे प्रश्न संपलेले नाहीत. पोलिसांवरील कारवाई सुडबुध्दीने तर झालेली नाही ना? याचाही शोध घेणे आवश्यक आहे.
डिझेल कारवाईत राजकीय दबाव ?याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सोमवारपासून ते आजपर्यंत या प्रकरणात केवळ गौतम वसंत बेळगे हा एकच आरोपी अटकेत आहे. त्याच्याव्यतिरिक्त एकही आरोपी अटक नाही. टँकरमधील हे डिझेल राहुरी येथील पंपावरुन आले होते असे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले. हा पेट्रोल पंप कुणाचा आहे? राहुरी येथून त्यांनी नगरला हा टँकर का पाठविला? या पंपचालकावर काय कारवाई झाली हे काहीच अजून समोर आलेले नाही. पोलिसांवर जितक्या तडकाफडकी कारवाई झाली तितक्या जलदगतीने गुन्ह्याचा तपास होताना दिसत नाही. त्यामुळे डिझेलचा घोटाळा उघड होऊ नये असा काही दबाव आहे का? पोलीस पथकाने केलेली ही कारवाई काही मंडळींना आवडलेली नाही काय? अशाही शंका या प्रकरणात निर्माण झाल्या आहेत. तसे नसेल तर अधीक्षकांनी गुन्ह्याचा तपासही पुढे नेणे आवश्यक होते. हे डिझेल बनावट असेल तर ती गंभीर बाब आहे.