घारगाव : संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे सात दुकाने फोडली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, तीन ते चार चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. चोरट्यांनी किती ऐवज चोरुन नेला हे मात्र समजू शकले नाही. नाशिक-पुणे महामार्गावर वरुडी फाटा येथे दुकानांचे शटर वाकून चोरट्यांनी आत प्रवेश करीत रोख रकमेसह ऐवज लांबविला. यात गोविंद कलेक्शन, मातोश्री कृषी सेवा केंद्र, श्रावणी ब्युटी पार्लर, शिवम ट्रेडर्स, अमेरिया मेडिकल, प्रशांत मोबाईल शॉपी, साईश्रध्दा कॉम्प्युटर्स यांच्यासह अन्य दुकानांचा समावेश आहे. विशेषत: ही सर्व दुकाने एकमेकांना लागून आहेत. या भागात मोठी वर्दळ असते. चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास दरम्यान दुकाने फोडली असावीत. या चोरट्यांकडे शटर वाकविण्यासाठी व कुलपे तोडण्यासाठीही चांगलेच साहित्य होते. दोन दिवसांपूर्वी याच परिसरातून मंगेश फटांगरे यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.-१७, बी.डब्लू.५७१७) चोरीला गेली आहे. माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्यासह पोलीस नाईक संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वरुडी फाटा येथे चोरट्यांनी सात दुकाने फोडली; चोरटे सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:46 AM