कोरडगाव : दुलेचांदगाव (ता. पाथर्डी) येथे गेल्या आठ दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास चोर धुमाकूळ घालतात. त्यामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण आहे.
दुलेचांदगाव येथे आठ दिवसांपासून गावातील वस्त्यांवरील रोहित्र बंद करून चोरीचा प्रकार घडत आहे. घरांवर दगडफेक करणे, शेळ्या, कोंबड्या, दागिने चोरण्याच्या प्रकार सुरू आहे. म्हातारदेव ढाळे, मच्छिंद्र शेळके व बाळासाहेब घोरपडे यांच्या वस्तीवर चोरांनी दरवाजे मोडून गेट तोडून दगडफेक करत चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु इतर शेतकरी मदतीला आल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.
बाळासाहेब घोरपडे यांच्या वस्तीवर त्यांचे भाऊ सुनील घोरपडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. ते अहमदनगर येथे उपचार घेत आहेत. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस सहायक निरीक्षक प्रवीण पाटील यांनी भेट दिली. त्यांनी २४ सप्टेंबरला रात्री आठ वाजता भेट दिली होती. ते गेल्यानंतर काही वेळातच शेजारील वस्तीवर राहणारे सोमनाथ मैद यांच्या वस्तीवर चोरांनी चोरी केली.