बाभळेश्वर : बाभळेश्वर (ता.राहाता) येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फोडले. यातून सुमारे १९ लाख ९३ हजार २०० रुपये इतकी रोकड लांबविली आहे. बाभळेश्वर येथे लोणी संगमनेर रोडलगत घोगरे पेट्रोल पंपाच्यासमोर बँक आॅफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखेचे येथे एटीएम आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमचा दरवाजा तसेच इतर साहित्याची तोडफोड करुन आत प्रवेश केला. संपूर्ण एटीएम बाहेर काढले. एटीएम जड असल्यामुळे ते एटीएम वाहनापर्यंत ओढून नेण्यात आले. एटीएम ओढून नेल्याच्या येथे खुणा आहेत. एटीएमच्या आवाजाने परिसरातील काही नागरिक जागे झाले. याची चाहूल चोरट्यांना लागली. त्याक्षणी चोरट्यांनी एटीएम गाडीला लावून लोणीच्या दिशेने धूम ठोकली. एटीएमचे बरेच पार्ट रस्त्याच्याकडेला पडले होते. बाभळेश्वर येथील काही तरुणांनी चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु भरधाव वेगाने ती गाडी निघून गेली. वाहन कोणते होते हे मात्र समजू शकले नाही. आजपर्यंत या ठिकाणी दोनदा एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यामुळे फुटेज दिसत नाही. महाराष्ट्र बँक खासगी कंपनीद्वारे एटीएम चालवते. बँकेची सुरक्षा ही रामभरोसे आहे. या चोरीप्रकरणी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.
एटीएम फोडून चोरट्यांनी २० लाख लांबविले; बाभळेश्वर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 5:03 PM