भेंडा : भेंडा (ता. नेवासा) येथील नरेंद्रनगरमधील सीमा रवींद्र निकम (वय ४२) यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण धूम स्टाईलने पळवले. शनिवारी या भागात लग्न होते. यामुळे दुचाकीवरून येथे तरूण चकरा मारत होते. त्यांना विचारणा केल्यावर निघून जात. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सीमा निकम या अंगण झाडत असताना विना क्रमांकाच्या हिरो होंडा दुचाकीवर आलेल्या तरूणांनी ओ ताई... अशी हाक दिल्याने त्या उभा राहिल्या लगेच तरूणांनी गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. निकम यांनी आरडाओरडा केला. तोपर्यंत दुचाकीस्वार फरार झाले. त्यांनी तोंड बांधलेले होते. पूर्वी या घटना शहरी भागात घडत होत्या. ग्रामीण भागात दिवसा अशी घटना घडत असल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. याबाबत महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुस-या घटनेत भेंडा साखर कारखान्याचे कर्मचारी नामदेव शिंदे हे शुक्रवारी श्रीरामपूर येथे दुचाकीवरून दवाखान्यात जात असताना पाठिमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी अनिता नामदेव शिंदे यांच्या गळ्यातील पर्स हिसकावून पळ काढला. ही घटना पुनतगाव फाट्यावर घडली. शिंदे यांनी त्वरित घटनेची माहिती नेवासा पोलिसांना दिली. पर्समध्ये सोन्याची अंगठी, स्मार्ट फोन व ५ हजार रुपये रोख असा ऐवज होता. दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी तोंड बांधलेले होते.
भेंड्यात चोरट्यांचा धुमाकूळ; भरदिवसा महिलेची पर्स, गंठण धूम स्टाईलने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 4:11 PM