लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहमदनगर ) : तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीतील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ उभे असलेल्या कंटेनरच्या डिझेलच्या टाकीचा लॉक तोडून डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी चोवीस तासात शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ९ हजार ७६५ रुपये किमतीचे १०५ लिटर डिझेल पोलिसांनी हस्तगत केले आहे.
बुधवारी टोल नाक्याजवळ उभे असलेल्या कंटेनरच्या डिझेलच्या टाकीतून ११ हजार १६० रुपये किमतीचे १२० लिटर डिझेल चोरी गेल्यासंदर्भात कंटेनर चालक रामकुमार शिवप्रसाद पटेल ( वय २९, गाव बनपुकरा ता.शिराथु,जि.कौसांबी, राज्य उत्तर प्रदेश ) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरट्यांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत समृध्दी महामार्गाजवळ, जेउर कुंभारी शिवारात डिझेल चोरी करणारे काही संशयीत व्यक्ती असल्याची माहिती मिळाली.
त्यावर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.पी.पुंड, के. ए. जाधव, संभाजी शिंदे, महेश फड, वाय. बी. सुंबे, जी. पी. थोरात, राम खारतोडे, गणेश काकडे यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन संशयीतांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले डिझेल रमेश वायदंडे यांचेकडील चारचाकी मधुन राहाता तालुक्यातील रामपुरवाडी रोड शिवारातील पत्राचे हॉटेलमध्ये लपवुन ठेवले असल्याचे सांगितले.
रविराज किशोर देसले (वय २६, रा. निमगांववाडी, ता. राहाता), विक्की मच्छिंद्र गायकवाड (वय २७,निमगांववाडी ता. राहाता ), तान्हाजी किसन वायदंडे ( वय ६०, रा. गणेशनगर ता. राहाता ), साहेल अली इम्तीयाज सय्यद ( वय ३५, रा. जाज माउ, शितला बाजार, मॉर्डन टेंडरीचे बाजुस ता. जि. कानपुर हल्ली रा. शिर्डी ता. राहाता )असे अटक केलेल्या चौघां आरोपींची नावे असून पाचवा आरोपी रमेश तानाजी वायदंडे (रा. गणेशनगर ता.राहाता) हा फरार झालेला असुन त्याचा शोध सुरु आहे.
दरम्यान सोहेल अली इम्तीयाज सय्यद याचेवर घारगाव पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे चार गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी तान्हाजी किसन वायदंडे याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. रमेश तानाजी वायदंडे याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"