मिरजगाव : पाऊस नसल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून नापिकीमुळे कर्जत तालुक्यातील थेरगाव (रायकरवाडी) येथील राजेंद्र सोपान रायकर (वय २८) या युवकाने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छपराच्या घराला आतून कडी लावून छताला दोरी लावून गळफास घेतला. शेजारी राहणारे दूध आणावयास गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. राजेंद्र यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. ‘मी पूर्ण निष्क्रिय झालो आहे. दुष्काळामुळे कसलेही पीक नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. शेतीवरील कर्ज कसे फेडायचे? या चिंतेतून मी आपले जीवन संपवत आहे’असे चिठ्ठीत म्हटले आहे.त्याचे शिक्षण बीएस्सी असून पुढे शिकण्याची इच्छा होती. परंतु घरची परिस्थिती बिकट होती. बहिणीच्या लग्नाचे कर्ज,बँकेचे कर्ज यामुळे तो सतत चिंतेत असायचा, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्यामागे आई, वडील, लहान भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. मिरजगाव पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी प्रल्हाद लोखंडे तपास करीत आहेत. या घटनेने थेरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
नापिकीमुळे थेरगावच्या युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:33 AM