अहमदनगर : अंधश्रद्धा व स्वार्थी हेतूने मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी बुधवारी आरोपी पुरुषोत्तम शशिकांत रोडी यास पाथर्डीतील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. या प्रकरणात आता अटक केेलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. पोलिसांनी जिल्हा न्यायालयात सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.
सोलापूरचा पंडित प्रदीप मार्तंडराव जाधव, देवस्थान ट्रस्टचा तत्कालीन विश्वस्त संदीप रावसाहेब पालवे, रवींद्र बाजीराव शिंदे, पुरुषोत्तम शशिकांत रोडी, विक्रम रभाजी दहिफळे व श्रीधर लक्ष्मण गिरी यांच्याविरोधात तपासात समोर आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात आरोपी प्रदीप जाधव व संदीप पालवे यांना पोलिसांनी अटक केलेली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी तिसरा आरोपी पुरुषोत्तम रोडी याला त्याच्या पाथर्डीतील राहत्या घरातून बुधवारी (दि. १९) अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील अनंत चौधरी यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी रोडी हा मोहटा ट्रस्टचा लेखापाल म्हणून कार्यरत होता. सोलापूरचा पंडित प्रदीप जाधव याने सुवर्णयंत्रे बसविण्यासाठी घेतलेल्या १८९० ग्रॅम सोन्यापैकी १९० ग्रॅम सोने आरोपी रोडी याने कमिशन म्हणून घेतले. ते सोने त्याच्याकडून हस्तगत करायचे आहे. तसेच इतर सखोल तपास करायचा आहे. त्यावरून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. उन्हाळे यांनी आरोपीस २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.