कर्जत : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (दि.२५) मुबंई विधानभवन येथून एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. राम शिंदे यांचा एकेरी उल्लेख करीत धमकीवजा ‘तुझ्याकडे बघतोच’ असा इशारा दिल्याने या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने मंगळवारी येथे मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत पोलीस प्रशासनास निषेध निवेदन दिले.
कर्जत-जामखेड एमआयडीसीबाबत सोमवारी आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. याबाबत उदयोगमंत्री उदय सामंत यांनी यावर उद्या निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देत उपोषण स्थगित करण्याचे पवार यांना सांगितले. यावर आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमाशी प्रतिक्रिया देताना एका प्रश्नाचे उत्तर देताना भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांना धमकीवजा एकेरी भाषा वापरली.
सदरची भाषा पवार कुटुंबियांना आणि त्यांच्या संस्काराला न शोभणारी आहे. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक वक्तव्य करीत आपणाकडे लक्ष वेधण्यासाठी करीत असल्याचा आरोप कर्जत भाजपाने केला. मंगळवारी दुपारी वरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे आणि जिल्हा प्रसिध्द प्रमुख सचिन पोटरे यांनी आपल्या भाषणात आमदार पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ आणि अमरजीत मोरे यांना निषेध निवेदन देण्यात आले.