अहमदनगर: खासगी शाळांचे न परवडणारे शुल्क, दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांचा सुधारणारा दर्जा, तसेच मोफत शिक्षण यामुळे मराठी शाळांकडे व त्यातही जिल्हा परिषद शाळांकडे ओढा वाढला आहे. यंदा इंग्रजी शाळांमधून सहाशे विद्यार्थी मराठी शाळांमध्ये दाखल झाले आहेत.
जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाची चढाओढ सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या काही वर्षांपासून कमी होत होती. परंतु, यंदा इंग्रजी शाळांमधून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये व त्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. चालू शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या वर्गात ६०२ विद्यार्थी इंग्रजी शाळांमधून दाखल झाले आहेत. अनेक जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारत असल्यामुळे हा बदल झाल्याचे पालकांकडून समजते आहे.
दरम्यान, यंदा पहिल्याच वर्गात ३७ हजार ४१० विद्यार्थी दाखल झाले. त्यातील ३४ हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल झाले आहेत, तर इतर शाळांत केवळ ३ हजार मुलेच दाखल झाले आहेत, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकेजिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत मोफत गणवेश, तसेच मोफत पाठ्यपुस्तके शासनाकडून देण्यात येतात. यावर्षीपासून बूटही देण्यात येणार आहेत. याशिवाय मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्त्या अशा सुविधा मिळत असल्याने जिल्हा परिषदेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी शाळांतून मराठी शाळेत आलेले विद्यार्थी
- पहिली ५३
- दुसरी १५५
- दुसरी १८१
- चौथी १४६
- पाचवी ४०
- सहावी ८
- सातवी १८
- आठवी १
पहिलीत ३७ हजार विद्यार्थी दाखलइंग्रजी व मराठी अशा दोन्ही माध्यमात यंदा पहिलीच्या वर्गात एकूण ३७ हजार ४१० विद्यार्थी दाखल झाले. त्यात ३४ हजार २०७ विद्यार्थी जिल्हा परिषदेत दाखल झाले, तर केवळ ३ हजार २०३ विद्यार्थी इतर शाळांमध्ये दाखल झाले. यावरून पालकांनी जिल्हा परिषद शाळांना पसंती दिल्याचे आढळून येत आहे.