विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:57 IST2025-04-03T09:56:36+5:302025-04-03T09:57:20+5:30
साखर कारखान्यांच्या निवडणुकांत पुन्हा एकदा विखे-थोरात हा संघर्ष दिसू शकतो.

विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांच्यात पुन्हा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण, पद्मश्री विखे व थोरात या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तनपुरे साखर कारखान्याची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्याने या कारखान्याची निवडणूकही कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांत तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. थोरात यांनी विखे यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्यात विखे पाटील यांचे पॅनल पराभूत केले. त्यानंतर गत विधानसभा निवडणुकीत विखे पाटील समर्थक अमोल खताळ यांनी थोरात यांना आव्हान देत त्यांना संगमनेर मतदारसंघात पराभवाचा धक्का दिला. विधानसभेनंतर आता थोरात यांचे वर्चस्व असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत विखे व खताळ हे थोरात यांना आव्हान देतील अशी चिन्हे आहेत. विखे यांचे वर्चस्व असलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचीही (प्रवरा) निवडणूक जाहीर झाली आहे. गणेशनंतर विखे यांचे विरोधक आता त्यांना प्रवरा कारखान्यातही आव्हान देतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांत पुन्हा एकदा विखे-थोरात हा संघर्ष दिसू शकतो.
अवसायनात निघालेल्या डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रियाही लवकरच जाहीर होऊ शकते. कारण या कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तनपुरे कारखान्याच्या राजकारणाकडेही विखे व आमदार शिवाजी कर्डिले यांचे लक्ष असते. दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे समर्थकही मैदानात उतरु शकतात.
'तनपुरे'त विखे-कर्डिले विरुद्ध तनपुरे सामना
डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असतानाच राजकीय बैठकांनाही वेग आला आहे. तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.