अहमदनगर : एकमेकांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी योगायोगाने दिल्लीला एकाच विमानाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यात गप्पाही झाल्या. मात्र, चर्चेचा तपसील समजला नाही.शिर्डी येथून सकाळी १०.३० वाजता स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी शेजारीच जागा मिळाली. अधिवेशनाची दोन दिवसांची सुट्टी संपल्यानंतर खासदार विखे पुन्हा दिल्लीला अधिवेशनासाठी निघाले होते. तर थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तेही वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला निघाले होते. दरम्यान शेजारी-शेजारी बसलेल्या थोरात-विखे यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. दोघांनीही विविध विषयांवर चर्चाही केल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही नेमकी ही चर्चा काय झाली हे अद्याप समजू शकले नाही.दोघेही एकेकाळी काँगे्रसमध्ये होते़ विखे व थोरात यांचे मतदारसंघ शेजारी-शेजारी असल्यामुळे त्यांचे विविध मुद्यांवरुन नेहमी राजकीय वाद होते. राजकीय वर्चस्वावरुन दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दवडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील वाद राज्याला परिचित आहेत़ सुजय विखे यांनी थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात कमळ फुलविण्याची घोषणा केली आहे. तर राधाकृष्ण विखे यांनीही जिल्ह्यात १२-० करण्याची जबाबदारीही सुजय यांच्यावर टाकली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांचीच निवड झाल्यामुळे विखे - थोरात यांच्यातील वाद अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विमानातील त्यांच्या या योगायोगाच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हा योगायोग, की...?; सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात विमानात शेजारी-शेजारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 1:01 PM