कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये संगमनेरातून मुंबईकडे गोमांस घेऊन जाणारी अनेक चारचाकी वाहने नाशिक पोलिसांनी पकडली होती. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तसेच भाजीपाला व टरबूजांखाली लपवून गोमांस मुंबईला नेण्यात येत होते. सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांनी गोमांसाची वाहतूक करणारी वाहने अनेकदा पकडून कारवाई केली होती.
‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून राज्यात शनिवार व रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे स्वत: रस्त्यावर उतरून कारवाई करीत होते.
शहरातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी सुरू होती. परराज्यातील प्रत्येक वाहनांची तपासणी करीत त्यामधून प्रवास करणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात होती. तसेच विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुचाकींवरून फिरणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी चोप दिला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कारवाई करत होते.
..............
‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेल्या निर्बंधांचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. पोलिसांच्या भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते आहे. गुटखा, मद्य, गोमांस तस्करी होवू नये, याकरिता विशेष प्रयोजन करण्यात आले आहे.
-
मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस ठाणे
फोटो नेम : ११संगमनेर