शेवगाव : बहुचर्चित अर्सेनिक अल्बमच्या वाघोली (ता. शेवगाव) ‘त्या’ खराब गोळ्यांच्या ४०० डब्या पंचायत समितीने ताब्यात घेतल्या असून, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपासणीसाठी पाठवणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिली.
ग्रामसेवकाने ग्रामपंचायत कार्यालयातील त्या गोळ्यांच्या डब्यांची पाकिटे सरपंचांना कल्पना न देता बदलून घेतली असल्याची बाब समोर आली आहे. साहेबांचा दबाव असल्याने ती खराब दोन पाकिटे पंचायत समिती कार्यालयात जमा केली असून, चांगल्या गोळ्यांची पाकिटे ग्रामपंचायत कार्यालयात जमा केल्याचे ग्रामसेवकांनी मला फोनवरून कळविले आहे, असे वाघोलीचे सरपंच बाबासाहेब गाडगे यांनी सांगितले. गाडगे हे लग्न समारंभाच्या निमित्ताने पंढरपूर येथे गेले असताना त्यांच्या पश्चात हा प्रकार घडला आहे. हे प्रकरण उजेडात आणणारे भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश भलसिंग हेदेखील लग्नाच्या निमित्ताने बाहेर होते. त्यांनाही याबाबतची कल्पना नसल्याचे समोर आले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समितीच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या असेर्निक अल्बम या गोळ्या तालुक्यात घरोघरी वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. वाघोली येथे या गोळ्या वाटप करताना त्यातील काही पाकिटातील डब्यांतील गोळ्यांचे पाणी, तसेच घट्ट द्रव पदार्थ तयार झाल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी गावकऱ्यांनी त्या गोळ्या घेण्यास विरोध दर्शविला होता. दरम्यान, त्या खराब गोळ्यांची पाकिटे पंचायत समिती प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, या गोळ्या नागरिक घेतील की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.