स्वच्छ भारत अभियानअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाच मायगाव देवीत याबाबत उदासीनता दिसून येत आहे. गावात प्रवेश करणाऱ्या तिन्ही रस्त्याच्या कडेला घाणीच्या साम्राज्यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येकाला नाकावर हात ठेवण्यात यावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा, मानवी विष्ठा यामुळे परिसर अस्वच्छ बनला असून या ठिकाणी राहात असलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या बरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेला साचणारे कचऱ्याचे ढीग गावातील सांडपाणी वाहत असलेल्या गटारीमध्ये साचले जात आहे. यामुळे अडथळा निर्माण होऊन सांडपाण्याचा निचरा न झाल्याने तुंबण्याचे प्रकार होत आहेत. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डास उत्पत्ती होत आहे. यासाठी या परिसराची स्वच्छता करून या ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.