पारनेर : समाजाचे चांगले करणे हेच आमदार लंके यांचेे काम आहे. चांगले काम करणाऱ्यांना त्रास होतोच. जितका त्रास जास्त, तितका माणूस मोठा. तुकोबारायांना सर्वांनी त्रास दिला, ते जगद्गुरू बनले. ज्ञानेश्वर ज्ञानीयांचा राजा बनले. शिवाजी महाराज छत्रपती बनले, असे सांगत, टीकाकारांकडे लक्ष न देता लंके यांनी समाजकार्य असेच पुढे सुरू ठेवावे, असे आवाहन कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
श्रावण मासानिमित्त भाळवणी येथील काेविड सेंटरमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनसेवेप्रसंगी इंदुरीकर महाराज बोलत होते.
इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले, या आरोग्य मंदिरातून एक माणूस बरा होऊन गेला, तर त्याच्या मुखातून पडणारा शब्द काशीच्या अमृतापेक्षाही मोठा आहे. गरिबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही, मात्र देवपण आल्याशिवाय राहत नाही. हजारो रुग्णांना कोरोनाचे उपचार देणारे नीलेश लंके हे त्यांच्यासाठी आमदार नाहीत, तर त्यांच्यासाठी देव आहेत, हे कधीही लक्षात ठेवा. मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा असते. चांगल्या ठिकाणी केलेले काम कधीही दुप्पट होते. आज हॉस्पिटल विकत घेणारी माणसे होती. महिनाभर डॉक्टर ठेवणारे लोक होते. रुग्णाच्या वजनाइतके पैसे देणारेही लोक होते. मात्र ते रुग्ण वाचले नाहीत. मित्र, पाहुणे, संपत्ती, ऐश्वर्य कामाला येत नाही. मात्र चांगले कर्म वाया जात नाही. पुण्याला थोडा उशीर आहे, पण फळ निश्चित आहे, ते म्हणाले.
----
तिसरी लाट रुग्णांना लुटणाऱ्यांसाठी
कोरोनाची लाट गरिबांसाठी नव्हे, तर गरिबांना लुटणाऱ्यांसाठी येणार आहे. कोरोना साथीमुळे माणसे भांबावली. त्यांनी डॉक्टरची पदवी पाहिली नाही. तज्ज्ञ पाहिला नाही. डॉक्टरांनीही रुग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रुग्णांना लुटले, त्यांचे वाटोळे होणार. गरिबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल, हे सांगता येणार नाही, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.
-----
चांगल्याला चांगले म्हणण्यात अडचण काय?
आपल्या लोकांना आपल्या माणसाचे चांगले झालेले कधीच सहन होत नाही. प्रवृत्तीच आहे ती. सध्या नकारात्मक विचार असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. समाज अधोगतीला जाण्याचे हेच कारण आहे. सकारात्मक विचार नाहीत. आपल्या लोकांनी आता तरी एकत्र जगणे ही काळाची गरज आहे. लंके यांनी मोठे काम केले. काही करता आले नाही तरी, कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी केले.