संगमनेर : काँग्रेसमध्ये मानसन्मान असलेल्या अनेक नेत्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांना भाजपमध्ये कोणताही मान-सन्मान नसून त्यांना पाचव्या-सहाव्या रांगेत बसावे लागते आहे. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच झाली असल्याची टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. संगमनेरातील अमृता लॉन्स येथे रविवारी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष तांबे म्हणाले, काँग्रेस पक्षाला समृद्ध परंपरा असून ती राज्यघटनेशी बांधील अशी विचारधारा आहे. पक्षाने अनेक अडचणी पाहिल्या. यातून पुन्हा उभारी घेतली आहे. जमिनीवरचा कार्यकर्ता हीच या पक्षाची ताकद राहिली आहे. आगामी काळात युवकांना काँग्रेस पक्षात मोठी संधी आहे. जन माणसांचा काँग्रेसवर मोठा विश्वास आहे. प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष सोडला त्यांची सध्या खूप वाईट अवस्था आहे. त्या जागा आता तरुणांनी घेतल्या आहेत. असेही तांबे म्हणाले. |
भाजपात गेलेल्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार; सत्यजित तांबे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:31 PM