अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरील चोरलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी अहिल्यानगरकडे येत असलेल्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करत अटक केली. त्यांच्याकडून २४ लाख ९४ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सुयोग अशोक दवंगे (वय २१, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), संदीप किसन साबळे (वय २३, रा. पाचपट्टावाडी, ता. अकोले), संदीप निवृत्ती गोडे (वय २३, रा. सोमठाणे, ता. अकोले), अनिकेत अनिल कदम, (वय २१, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), दीपक विलास पाटेकर (वय २४, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), सचिन दामोदर मंडलिक (वय २९, रा. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात शनिवारी (दि. ८) चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चांदीचे टोप, चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर असे एकूण २४ लाख ९४ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास हाती घेत गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तांत्रिक विश्लेषणात सुयोग अशोक दवंगे याचे नाव समोर आले. त्याचा शोध घेत असताना आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी लोणी मार्गे अहिल्यानगरला येणार आहेत, अशी गोपनीय माहिती पथकाला मिळाली. पथकाने लोणी ते कोल्हार रस्त्यावर सापळा रचला. पोलिसांनी पाठलाग करत सहाही आरोपींना दागिन्यांसह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक निरीक्षक हेमंत थोरात, सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आदीच्या पथकाने केली. संगमनेर पोलिसांची भूमिका संशयास्पदकाकडवाडी हे गाव संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. तेथील महालक्ष्मी माता मंदिरात ८ मार्च रोजी चोरी झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. संगमनेर पोलिस मात्र हातावर हात धरून बसले. त्यांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही. चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे संगमनेर तालुका पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.