घारगाव (अहमदनगर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही सरकार म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहोत. मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. अशोक चव्हाणांना राजीनामा द्या म्हणणारे आता राजकारण करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकमताने विधानसभेत ठराव करत त्याचा कायदादेखील पास केला होता. यात मतभेद आणि राजकारण करण्याचे काही काम नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा येथील कोविड हेल्थ केअर सेंटरला शनिवारी (दि. ८) महसूलमंत्री थोरात यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमाेल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर, ॲड. सुहास आहेर, गोकुळ कहाणे, पोलीसपाटील बाळासाहेब कदम, दीपक ढमढेरे, ग्रामसेवक अशोक बलसाने, रमेश आहेर, संतोष घाटकर, गणेश सुपेकर, ज्ञानेश्वर सुपेकर, डॉ. राहुल आहेर, डॉ. अभिषेक हांडे, आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. आता जे टीका करत आहेत ते त्यावेळेस म्हणायचे की, न्यायालय ठरवेल आणि आता हेच लाेक राजकारण करत आहेत. यात कोणीही राजकारण करू नये, समाजहिताचे काम करावे. मराठा आरक्षणासाठी अजून काही मार्ग आहेत का? याचा शोध आम्ही घेत असून, तसा प्रयत्न करत आहोत, असेही थोरात म्हणाले.
-------
लसीकरणासाठी गर्दी करू नका
मध्यंतरी विवाह सोहळे, दशक्रिया विधी, वाढदिवस आदी कार्यक्रमांना सूट दिल्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता गाफील राहू नका, प्रत्येकाने काळजी घ्या. कोरोनामुळे तरूणांचेही मृत्यू होऊ लागले आहेत. लसीकरणासाठी आरोग्य केंद्रांमध्ये मोठी गर्दी होत आहे. लसीकरणासाठी गर्दी करू नका, शाळा आदी ठिकाणी असलेल्या इमारतीत लसीकरण घेण्याच्या सूचना महसूलमंत्री थोरात यांनी केल्या.