अहमदनगर : जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांना कुपोषणाच्या धोक्यातून बाहेर काढण्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रयत्नांना काहीसे यश आले आहे. कमी वजनाच्या बालकांची संख्या घटून २४ हजारांवर आली आहे. तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्याही घटून ३ हजार ८७४ वर आली आहे़. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे जिल्ह्यात एकात्मिक बालविकासचे २१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांद्वारे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कुपोषण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. जानेवारीमध्ये ३ लाख २३ हजार बालकांचा सर्व्हे करण्यात आला. बालकांचे वजन, उंची, दंडघेर घेत बालकांचे आरोग्य तपासण्यात आले. दर महिन्याला कुपोषणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात आहे. डिसेंबर २०१९ मध्ये सुमारे ३० हजारपेक्षा जास्त बालके कुपोषित असल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली होती़. सर्वेक्षणात ही आकडेवारी २४ हजार ९०० वर आली आहे. तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या डिसेंबरमध्ये ४ हजार ८० वरून ३ हजार ८७४ झाली आहे. राजूरमध्ये सर्वाधिक कुपोषणअकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यातील कुपोषणाची टक्केवारी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. अकोले व राजूर असे दोन प्रकल्प अकोले तालुक्यात आहेत. त्यात राजूर प्रकल्पांतर्गत सर्वाधिक ५़८० टक्के बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्याखालोखाल अकोले प्रकल्पात २़८६ टक्के बालके कुपोषित असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. वय, उंची वाढते; मात्र वजन घटतेबालकांची आरोग्य तपासणी करताना वयानुसार वजन आणि उंचीनुसार वजन घेतले जाते. वयानुसार वजन कमी असलेल्या बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर उंचीनुसार वजन कमी असलेल्या बालकांची संख्या तुलनेने नगण्य असल्याचे आढळून आले आहे. उंचीनुसार मध्यम कमी वजनाची २ हजार ७२६ तर तीव्र कमी वजनाची ५३४ बालके आढळून आली आहेत. वय, उंची वाढूनही वजन न वाढल्यामुळे ही बालके कुपोषित गृहित धरली जातात. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमार्फत योग्य पोषण आहार पुरवून या बालकांना सुदृढ करण्यावर प्रयत्न केले जात आहेत.
नगर जिल्ह्यातील २४ हजार बालके कमी वजनाची; राजूरमध्ये सर्वाधिक कुपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 4:29 PM