श्रीरामपूर : राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरेगाव येथील मतमाऊली यात्रेस शनिवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. यावेळी हजारो भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. भिज पावसातही भाविकांमध्ये दर्शनाची ओढ दिसून आली.राज्यात मुंबईनंतर हरेगाव येथील मतमाऊलीची यात्रा प्रसिद्ध आहे. यात्रेचे हे ७१ वर्ष आहे. दर्शनासाठी आलेल्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रबरोबरच मराठवाड्यातील भाविकांची संख्या मोठी होती. शेकडो किलोमीटर अंतर दिंडीने पायी चालत आलेल्या भाविकांसाठी सर्वच प्रमुख मार्गावर विविध सामाजिक संस्थांद्वारे चहा व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीरामपूर आगारातून एस.टी. बसेसच्या दिवसभर फेºया सुरू आहेत. यात्रा मंगळवारपर्यंत चालणार आहे.मतमाऊली चर्च येथे १ जुलैपासून यात्रापूर्व नोव्हेना नऊ शनिवारी झाली. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद धर्मप्रांतचे महागुरुस्वामी अम्ब्रोज रिबेलो यांच्या हस्ते मतमाउली यात्रेस ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. यात्रेपर्यंत दहा दिवस नोव्हेना घेण्यात आली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता जपमाळ, नोव्हेना, विधिवत मुकूट चढविणे हे धार्मिक कार्यक्रम पार पडले. स्थानिक धर्मगुरू नोलास्को, डॉमनिक रिचर्ड, व्हीकर जनरल वसंत सोज्वळ आदी धर्मगुरू यावेळी उपस्थित होते. हरेगाव फाटा ते चर्चपर्यंत पदयात्रेकरुंची रिघ लागली होती. दिवसभर तासातासाला फादर सचिन मनतोडे, पीटर डिसोझा, विशाल त्रिभुवन, फ्रान्सिस ओहोळ, विलास सोनवणे, सांतान रोड्रीग्ज यांची पवित्र मिस्सा झाली. दुपारी साडेचार वाजता नाशिक धर्मप्रांतचे प्रमुख धर्मगुरू लुुईस डनियल यांनी भाविकांना प्रवचन दिले. त्यांनी पवित्र मारियेचा महिमा व महत्व सांगितले. चर्च व डोंगरावर विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली आहे.
हजारो भाविकांनी घेतले मतमाऊलीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 2:52 PM