अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हजारो शिवप्रेमींनी नगरमध्ये मंगळवारी (दि़ ३) शिवसन्मान मोर्चा काढला.माळीवाडा बसस्थानकाजवळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व शिववंदना करुन सकाळी अकरा वाजता मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात सर्वात पुढे महिला व त्यांच्यामागे पुरुष अशी या मोर्चाची रचना होती. या मोर्चात हजारो शिवप्रेमींनी सहभाग घेतला. मोर्चात छिंदमविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माळीवाडा, कापडबाजार, चितळेरोडमार्गे हा मोर्चा चौपाटी कारंजा येथे आला.
तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अॅड. गजेंद्र दांगट यांनी निवेदन वाचून दाखविले. हे निवेदन नंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. साडेबारा वाजता मोर्चा विसर्जित करण्यात आला. दरम्यान मोर्चाच्या मार्गावरील सर्व वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. मोर्चादरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, श्रीपाद छिंदमविरोधात २००१ मध्ये अवैध हत्यार बाळगणे व विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर बुलडोझर चालवून दुकान उद्धवस्त करुन एका कुटुंबाचा छळ केल्याप्रकरणी छिंदमविरोधात दुसरा गुन्हा २०१० मध्ये दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०१३ मध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल श्रीपाद व त्याचा भाऊ श्रीकांत या दोघावर तडीपारीची कारवाई केली होती. परतु राजकीय वरदहस्तामुळे ती बारगळली. नोव्हेंबर २०१५ मध्ये दोघा भावांनी दोन तरुणींवर अत्याचार व हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. फेबु्वारी २०१८ छिंदम याने शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आत्तापर्यंत छिंदमवर सहा प्रकारचे गुन्हे आहेत. मात्र, शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करुनही पोलिसांनी त्याच्याविरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी वाढीव कलम का लावले नाही, असा प्रश्न शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.