अहमदनगर : नगर तालुक्यातील सारोळा कासारच्या सरपंच आरती रवींद्र कडूस आणि ग्रामसेवक टी.के.जाधव यांच्यासह इतरांना ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१३)दुपारी घडला. याप्रकरणी सदस्य नामदेव नाथा काळे याच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सारोळा कासार ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीतून काळे मळा जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. कार्यक्रम सुरु असताना ग्रामपंचायतसदस्य नामदेव काळे तेथे आले व तुम्ही कोणाला विचारून काम सुरु केले मी काम होऊ देणार नाही असे म्हणत ठेकेदाराला दमबाजी करून काम बंद पाडले. सरपंच कडूस यांनी काळे यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता कडूस यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. उपस्थित ग्रामसेवक इतर सदस्यांनीही काळे यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कुणाचेही न ऐकता ठेकेदार व त्याच्या कर्मचा-यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत काम बंद पाडले.याप्रकरणी सरपंच आरती कडूस यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फियार्दी वरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.