कर्जत : ठेकेदारांनी सादर केलेले अवास्तव बील काढण्यास नकार दिल्याने महावितरणच्या अधिका-यास धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली. याप्रकरणी दोन ठेकेदारावर कर्जत पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर शिवारात स्पेक्ट्रम इलेकटीकल कंपनीने नवीन लाईन व रोहित्र टाकण्याचे काम केले होते. या कामाचे बील या कंपनीच्या संबंधित ठेकेदारांनी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता कर्जत यांच्याकडे सादर केले होते. पण हे बील प्रत्यक्ष झालेल्या कामापेक्षा जादा आहे ही बाब महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्या लक्षात आली. झालेल्या कामापेक्षा जादा बील मंजुरीसाठी सादर केले होते. हे बील मंजूर करण्यास उप कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी नकार दिला.
यामुळे स्पेक्ट्रम कंपनीचे ठेकेदार अक्षय प्रकाश काळे व सुरज तुळशीराम कांबळे यांनी उपकार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्या व्हॉट्स् अॅपपवर इतर ठिकाणी झालेल्या कामाचे फोटो टाकले. या कामाचे काय आहे ते सांगा? अन्यथा तुमची तक्रार वरिष्ठांकडे करू. तुमचे काय आहे ते सांगा? आम्ही तुम्हाला भेटायला येतो, असे म्हणून माझ्यावर दबाव आणला. मला दमदाटी केली. ब्लॅकमेल केले. असे घुले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अक्षय प्रकाश काळे (रा.जवळा, ता.जामखेड), सुरज सीताराम कांबळे ( पत्ता माहीत नाही) या दोघांविरोधात कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.