कोपरगाव : क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून सात जणांनी मिळून तिघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी, तसेच स्टंपने तोंडावर, पाठीवर, पायावर मारहाण केली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया कारखान्याच्या क्रिकेट मैदानावर रविवारी (दि.२८) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
संजय सुभाष जाधव, संदीप सुरेश जाधव व विठ्ठल बाळसाहेब जाधव (सर्व रा. वारी, ता. कोपरगाव) अशी मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणी संजय सुभाष जाधव (वय ४४, रा. वारी, ता. कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून अतुल विनायक लोंढे, संगीत विनायक लोंढे (दोघे रा. बाबूळगाव खुर्द, ता. येवला, जि. नाशिक) व गोरख शंकर टेके, सूरज गोरख टेके, राजेंद्र शंकर टेके, अभिजीत गोरख टेके, संजय वाबळे (सर्व रा. वारी, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध सोमवारी (दि. २९) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झालेल्या संजय जाधव यांनी सप्तशृंगी टीमने खेळाडू बदलला असल्याचे आयोजकांना फोटो दाखवून निर्दशनास आणून देत असतानाच अतुल लोंढे व संगीत लोंढे यांनी जाधव यांना स्टंपने पाठीवर, पायवर मारहाण केली. त्यांनंतर अतुल लोंढे याने कॉलर पकडून जाधव यांना स्टेजवर ओढत नेले. त्यावर सोडवासोडवी करण्यासाठी आलेल्या संदीप जाधव व विठ्ठल जाधव यांनाही उर्वरित पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहण केली. पुढील तपास राजेंद्र म्हस्के करीत आहेत.