श्रीगोंदा/ जवळे : श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव नजिकच्या चाव्हर वस्तीजवळ कुकडी कालव्याच्या १३ नंबर चारीत सोमवारी सकाळी दोन प्रेतं आढळून आली. तर पारनेर तालुक्यातील जवळे येथील सिद्धेश्वर बंधा-यात एक प्रेत आढळून आले आहे. तीनही प्रेतं पुरुषांची असून, पोलीस पुढील शोध घेत आहेत.श्रीगोंदा तालुक्यातील चाव्हर वस्ती शिवारात कुकडी चारीत एक प्रेत वाहून येऊन झुडपात गुंतलेले स्थानिकांनी पाहिले. हे प्रेत २५ ते २७ वर्ष वयोगटातील पुरुषाचे असून, अंगावर निळा सदरा, काळी-खरडी रंगाची पैंट आणि दिव्या कंपनीची विटकरी रंगाची अंडरविअर आहे.दुसरे प्रेत पहिल्या प्रेताच्या मागेमागे वाहून येत असल्याचे स्थानिकांनी पाहिले़ दुसरे प्रेत ४० ते ४५ वर्षाच्या पुरुषाचे आहे. दुसरे प्रेत नग्न असून, सडलेले आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देताच पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ, दादा टाके हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही प्रेत पाण्याबाहेर काढून पंचनामा केला आहे. दोन्ही प्रेतांची ओळख पटली नसून, शवविच्छेदनासाठी दोन्ही प्रेत श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली आहेत.तिसरे प्रेत पारनेर तालुक्यातील जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्यावरील बंधा-यात आढळले. हे प्रेत बंधा-यात तरंगताना पाहिल्यानंतर परिसरातील लोकांनी पोलिसांना कळविले. गोविंद देवराम केदारी (वय ३०) असे मयताचे नाव असून, जवळे येथील रहिवासी आहे. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतरही पोलीस घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी व परिसरातील रहिवाशांनी गोविंद केदारी यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
नगर जिल्ह्यात पाण्यात आढळली तीन प्रेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:31 AM