कोल्हार : कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे. सध्या कोल्हार भगवतीपूरसह परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार आणि धुमाकूळ सुरूच आहे. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात गळनिंब व कुरणपूर येथे दोन चिमुरड्या गंभीर जखमी झाल्यानंतर आता वनखात्याचे अधिकारी जागे झाले आहेत. कोल्हार येथील तीन चारी परिसरात नितीन देवकर यांच्या गट नंबर ३७२ मध्ये डाळिंबाच्या बागेत रविवारी सकाळी तीन बछडे आढळून आले. त्यांनी तातडीने वनखात्यास याची माहिती दिली. सध्या इथेच गळनिंब परिसरात ठाण मांडून बसलेल्या अधिका-यांनी तातडीने धाव घेत बछड्यांना ताब्यात घेतले आहे.पिंज-याच्या ठिकाणी जाण्यास मनाईबिबट्याच्या मादीला या ठिकाणचे पिल्ले दिसली नाहीत तर पिल्लांच्या विरहाने मादी धुमाकूळ घालू शकते. या पार्श्वभूमीवर तिन्ही बछड्यांना पिंजरा लावून त्यामध्ये ठेवण्यात आले आहेत. बछड्यामुळे बिबट्या मादीही जेरबंद होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पिंज-याजवळ कोणीही जाण्यास धजावत नाही. कुठल्याही क्षणी बिबट्याची मादी पिल्लांच्या शोधत आल्यास मानवावर हल्ला करू शकतो. यासाठी सदर परिसरात सर्वांना जाण्यास बंदी केली आहे. बिबट्या नर अथवा मादी पिंज-यात अडकल्यास एका मागोमाग पाचवा बिबट्या जेरबंद होऊन परिसरातील बिबट्याची दहशत कमी होऊ शकते.
कोल्हारमध्ये आढळली बिबट्यांची तीन बछडे; वनखात्याने लावला पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 4:31 PM