शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेर तालुक्यातील तिघांनी सुयश मिळविले. यात सुकेवाडी गावचे सुपुत्र मंगेश पाराजी खिलारी, मांची गावचे सुपुत्र स्वप्निल राजाराम डोंगरे आणि पिंपरणे गावच्या कन्या राजश्री शांताराम देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सुयश मिळविले. विशेष म्हणजे हे तिघेही शेतकरी कुटुंबांतील आहेत.
संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या सुकेवाडी गावातील मंगेश खिलारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३९६ वा क्रमांक मिळविला. त्यांचे वडील पाराजी खिलारी यांचे गावातच छोटेसे हॉटेल असून मंगेश यांची आई संगिता या बिडी कामगार आहेत. मंगेश यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शुक्लेश्वर विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी अकरावीला येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेथे अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुुढे कला शाखेत पदवीचे शिक्षण पुण्यातील एसपी महाविद्यालयात पूर्ण केले. पुण्यात राहून अभ्यास केला. घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा त्यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी मिळविलेले सुयश खरोखर कौतुकास्पद आहे.
कोल्हार-घोटी राज्यमार्गावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील मांची येथील स्वप्निल राजाराम डोंगरे हे देखील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील राजाराम दामोधर डोंगरे हे महावितरण कंपनीत नाशिक ग्रामीण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून तर आई वैशाली डोंगरे या नाशिक महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. स्वप्निल डोंगरे यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण संगमनेर शहरातील दिगंबर गणेश सराफ विद्यालयात झाले. पुढील शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केले. बीई मेकॅनिकल पदवी मिळविली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी दिल्ली गाठली आणि वयाच्या २८ व्या वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७०७ वा क्रमांक मिळविला.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील राजश्री शांताराम देशमुख यांनी वयाच्या २५ वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. त्यांचे प्राथमिक शिक्षण संगमनेरातील डेरे इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाले आहे. अकरावी आणि बारावीचे विज्ञान शाखेतून शिक्षण त्यांनी शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. एमआयटी, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली. त्यानंतर पुढे तीन वर्ष दिल्ली येथे राहून अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७१९ वा क्रमांक मिळविला. त्यांचे वडील शांताराम उत्तमराव देशमुख हे माजी सैनिक असून सेवानिवृत्तीनंतर ते शेती करतात. प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित आहेत.