अहमदनगर/रुईछत्तीसी : नगर-सोलापूर रोडवरील रुईछत्तीसीजवळ असलेल्या अंबिलवाडी (ता. नगर) येथे झायलो व एसटी़ बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि.२८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मयत व जखमी हे एकाच कुटुंबातील असून ते झायलोमधून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. या अपघातात अरुण बाबुराव फुलसौंदर (वय ६०) ताराबाई शंकरराव भगत (५८ रा. दोघे बुरुडगाव रोड, नगर) व अर्जुन योगेश भगत (वय ८ रा़भगतमळा, सिव्हिल हडको, नगर) यांचा मृत्यू झाला असून आरती योगेश भगत, रत्नमाला अरुण फुलसौंदर, शंकर भगत व कृष्णा भगत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
फुलसौंदर व भगत कुटुंबीय शनिवारी झायलो जीपमधून नगर-सोलापूर रोडमार्गे पंढरपूरला जात होते. झायलो अंबिलवाडी परिसरातून जात असताना राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकोट ते मालेगाव ही बस समोरून येत होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात झायलो जीपचा पूर्णत: चक्काचूर झाला. एसटी बसची पुढील एक बाजूही पूर्णपणे आत गेली. या घटनेत बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी झायलोत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रस्ता नव्हे मृत्युचा सापळा नगर-सोलापूर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. खराब रस्त्यामुळे दरेवाडी ते मिरजगावपर्यंत वारंवार छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. रुईछत्तीसी व अंबिलवाडी परिसरात गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा बळी गेला आहे. नगर-सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे़ प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़ खराब रस्त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. या रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. -रवींद्र भापकर, पंचायत समिती सदस्य, नगर तालुका.नगर-सोलापूर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातात आजपर्यंत अनेकांनी जीव गमविला आहे. प्रशासन अजून किती मृत्युची वाट पाहणार आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.- संतोष म्हस्के, संचालक, बाजार समिती.