कोपरगाव (जि.अहमदनगर) : तालुक्यातील खेर्डी गणेश शिवारात नगर- मनमाड महामार्गावर ट्रक व दुचाकीचा अपघात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झाला. या अपघातात पुरुष महिला व एक दीड वर्षीय मुलगी असे तिघेजण जागीच ठार झाले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नगर मनमाड रस्त्यावर कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश शिवारात शुक्रवार (दि.१५) रोजी दुपारी चारच्या सुमारास ट्रक आर. जे. १४ जी. जे. ३४६८ व दुचाकी एमएच ४१ जे. २४५१ यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३५ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला व दीड वर्षाची मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली. हे तिघेही पती-पत्नी व मुलगी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याजवळ ओळख पटेल अशी कोणतीही कागदपत्रे आढळून आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवळी, रमेश झाडे यांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान ट्रकचालक तेथून फरार झालेला होता. पोलिसांनी सदर ट्रक ताब्यात घेतला आहे. दूचाकी वरील नंबर प्लेटवर अश्विन असे नाव लिहिलेले आहे.