बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : तालुक्यातील चिंभळे येथील पैलवान किरण व भूषण गायकवाड यांनी दीड एकर क्षेत्रात खरबुजाचा मळा फुलविला. पैलवानांच्या श्रमाला गोड फळे बहरली अन अवघ्या तीन महिन्यात दीड एकर क्षेत्रात तीन लाखाचा आर्थिक सुगंध दरवळला आहे. गायकवाड बंधूंनी शेतीतील यशाची कुस्ती निकाली झाली.दादासाहेब गायकवाड यांना १५ एकर माळरान शेती पोकलेनने दगड धोंडे जमिनीत गाडून सपाटीकरण केले. एक मळा तयार केला. दादासाहेब यांना कुस्तीचा छंद असल्याने किरण आणि भूषणला पैलवान केले. कुस्त्या करता करता किरण व भूषण यांना शेतीचा छंद लागला. दादासाहेब व काकासाहेब यांनी शेततळे करून दिले. हळूहळू शेतीला आकार येऊ लागला. शेतीत ज्वारी, तूर ऐवजी भाजपाला आणि फळ शेतीत बहर दरवळू लागला.किरण व भूषण बंधूंनी नियोजन आणि श्रमाकडे लक्ष केंद्रित केले. पाच एकर गुलाबी कांद्यात आठ लाखाचे उत्पन्न काढले तर एक एकर टॉमेटोमधून पाच लाखाचा नफा मिळविला. मल्चिंग पेपर, ठिंबक सिंचनचा वापर करून दीड एकर क्षेत्रात खरबुजाचा मळा फुलविला आणि कृषितज्ज्ञ मधुकर काळाणे यांचे मार्गदर्शन घेतले. खरबुजाच्या पिकातून तीन महिन्यात तीन लाखाचे उत्पादन किरण व भूषण बंधूंनी घेतले. शेतीतील यशाची कुस्ती निकाली करून शेतीत अधिक उत्पन्न काढण्यासाठी नियोजन व कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली आहे.
वडिलोपार्जीत कमी शेती होती. चुलते काकासाहेब व वडिल दादासाहेब यांनी बोअरचा व्यवसाय करून शेती वाढविली आणि मला व भूषणला पैलवान केले. पैलवानकीची ताकद कुणाला तरी दम देण्यासाठी करण्यापेक्षा शेतीत मुरविण्याचा निर्णय घेतला. अल्प कालावधीत चांगले यश आले. त्यामुळे शेतीत काम करण्यासाठी उत्साह वाढला आहे, असे किरण गायकवाड यांनी सांगितले.