श्रीरामपूर : गोंधवणी येथील इसमाने झाडाला गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येप्रकरणी पंधरा दिवसानंतर एका खासगी फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचा-यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यातून हे कृत्य केल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. आत्महत्या केलेले संतोष पालकर यांच्या पत्नी गंगा संतोष पालकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन बजाज कंपनीचे वसुली अधिकारी तनवीर सिंकदर तांबोळी, एजंट विनायक मुसमाडे (दोघे रा. श्रीरामपूर) व कार्यालय व्यवस्थापक (नाव माहिती नाही) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाज फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी थकीत कर्ज वसुलीसाठी वारंवार तगादा करुन त्रास दिल्यामुळे संतोष घनश्याम पालकर (वय ४०) याने २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता वाकडी शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
संतोष यांनी २०१८ मध्ये बजाज फायनान्स कंपनीकडून जनरल स्टोअर्स सुरु करण्यासाठी एक लाख रुपये कर्ज घेतले होते. मार्च २०२० पासून संचारबंदी सुरू झाल्यामुळे कर्जाचे हप्ते थकले.
पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी घटनेचा तपास केला. पोलिसांनी मयत संतोष यांचे फोन कॉल्स तपासले. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.