विखे म्हणाले, जिल्ह्यावर अशी वेळ यावी, हे अतिशय वेदनादायी आहे. मागील काही दिवसांत प्रशासन फक्त ‘ब्रेक दी चेन’मध्ये गुंतले आहे. यातून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली का? उपचारांसाठी रुग्ण वणवण भटकत आहेत. बेडस्ची उपलब्धता नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यासंदर्भात प्रशासनाला विचारणा केली, तर आम्ही सूचना दिल्या आहेत, एवढेच उत्तर मिळते. नेमक्या सूचना केल्या कुणाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. पालकमंत्रीही केवळ पाहुण्यासारखे येतात आणि जातात. मंत्र्यांना सध्या फक्त केंद्र सरकारवर टीका करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची उपलब्धता करा. प्रत्येक मंत्र्याला आपल्या मतदारसंघात जिल्ह्यात २०० बेडचे कोविड रुग्णालय उभारायला सांगा. केवळ फेसबुकवर संवाद साधून जनतेचे समाधान तुम्ही करू शकणार नाही.
................
राज्याने लसीचे नियोजन केले नाही
केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिनचा पुरवठा केला; पण त्याचे नियोजन राज्य सरकार व्यवस्थित करू शकले नाही. केवळ आपले अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनच्या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होत असल्याचे आमदार विखे म्हणाले.